Friday, June 5, 2020

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी


                 

       प्रत्येक स्त्री ही आपल्या आयुष्यात खूप संकटाना पार करीत असते. प्रत्येकीचे आयुष्यत येणारे संकट वेगळवेगळी असतात.काही जिद्दीने लढतात,काही प्रतिकार करतात,काही सहन करतात,तर काही हार मानतात. समाजात स्त्री ला दुय्यम स्थान दिले आहे ..आणि याची उदाहरणं जेवढी देऊ तेवढी कमीच त्यातली ही स्त्री, जे नशिबी भोग आले आहे ते स्वीकारून आपले आयुष्य जगणारी..ही कविता त्या स्त्रियांना समर्पित ज्या आयुष्य हे फक्त तडजोडीवर  निभवत आहेत.ही "ती" ची कहाणी,
का आले असावे तिच्या नयनी पाणी ??
मृगजळाच्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी ती,
धास्तावलेली खूप काही मिळवण्यासाठी,
भूतकाळाच्या पाऊलखुणा दूर सारून,
वर्तमानाच्या जबाबदारीचा कडेवर लादून,
भविष्याच्या उमेदीच्या सांगड घालून,
राखीव आयुष्याकडे एक पाऊल टाकून,
मायेच्या उंबरठ्यापलीकडे हद्दपार झालेली,
ही "ती"  ची कहाणी खरंच का आले असावे तिच्या नयनी पाणी??
एक जाणीव मनात घेऊन,
एकदा मोडलेला पत्त्यांचा डाव,
पुन्हा रचण्यास ती सज्ज,
नवा जोश,नवी उमेद,नवे स्वप्न,
यात गुंफलेलं एक नवीन नातं,
होती मृगजळाची ही शर्यत जिंकायची,
मात्र हे सारं करताना ती स्वतःला विसरायची,
ही "ती" ची कहाणी,खरंच का आले असावे तिच्या नयनी पाणी?
तिची कहाणी इथेच थांबली नाही,
अशातच तिच्या सुखाच्या बहरत होत्या रात्री कितीक,
मात्र दुःखाच्या बिथरत होत्या अगणितिक,
विश्वासाचे बांध कोमेजून,
शरीरावर खुना उमटवून तो निर्धास्तपनाने मिरवून समाजात या वावरत होता,
मात्र प्रेमाने तिला कधीही सावरत नव्हता,
ही "ती"ची कहाणी,खरंच का आले असावे तिच्या नयनी पाणी?
मृगजळाची कहाणी संपली होती
मागे तडजोड उरली होती,
ऐकून तिची ही कहाणी,
तिच्या सोबत माझ्याही नयनी पाणी..
स्वतःला दोष देत ती म्हणाली,
दुभंगी आयुष्य नशिबी आले, दोष कुणाला का मी द्यावे?
सांगतात का उगाच थोरले मोठे,
ठेविले अनंते तैसेचि रहावे..!!
By:- Prachi Zade 

साद निसर्गाची!!🕊️🍂


        आठवतं शाळेमध्ये बालभारतीच्या पुस्तकांमधील गोष्टी..किती  छान वाटायचं जेव्हा ती गोष्ट वाचताना किंवा ऐकताना स्वप्न रंगावायचो आपण..नाचणारे मोर,कापसासारखा असणारा ससा, मडके भरणाऱ्या सरी, पाऊसातल्या कागदी होड्या,याशिवाय डोंगराच्या पायथ्याला घर घराभोवती हिरवाई,विविध पक्षी,फळे,फुले आणि बाजूनेच संथ वाहणारी नदी, निळे शुभ्र असणारे स्वच्छंदी आकाश..आपली शाळा सुटते तशी पाखरांची शाळा ही सुटते असंच आपण आजही समजतो..चित्र रेखाटन करताना देखील निसर्गाचं हेच चित्र रंगवायचो..आणि मामाच्या गावी जाणाऱ्या झुक झुक गाडीचा प्रवास, प्राण्यांविषयीचं आणि निसर्गाविषयीचं प्रेम, संगोपन या आणि कितीतरी  निसर्गाच्या गोष्टी ऐकून आपण कल्पनेचे बांध उराशी बांधून मोठे होत जातो..गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र असं समजणारे आपण आता गांडूळाची जागा रासायनिक खतांनी सर्रास घेतलेली आपण बघतो..आणि मग हळू हळू मोठं होताना जाणवतं की अरे आपण विचार केला तसा निसर्ग तर कुठे दिसतच नाही..हाती येते ती निराशा..कदाचित मग हे निराशेचे ओझे पेलवतच आपण निसर्गाच्या हानीचे याची देही याची डोळा साक्षीदार होतो..
     भरभरून देतो ,सावरतो, सुखावतो,सांभाळतो,निरपेक्ष प्रेम करतो,सावली देतो,सुख दुःखाचा सोबती होतो , अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करतो,शुद्धता,ताजेपणा,३ ऋतूंचा वाटेकरी हे सगळं आपल्याला निस्वार्थाने देतो तो म्हणजे निसर्ग..
      आणि आपण काय देतो?? वृक्षतोड,कचरा, अशुद्ध हवा, मुक्या प्राण्यांची हिंसात्मक हत्या आणि कितीतरी शिकारी, काँक्रिटचे जंगलं, निसर्गाचं बाजारीकरण, रासायनिक खतांचा बेसुमार वापर..
    निसर्ग काय सांगू इच्छितो ते ऐकूया..कारण त्याचं जतन आणि संवर्धन हे आपल्याच हातात आहे. 
         - प्राची 🎀
#जागतिकपर्यावरणदिन 🕊️
#canonphotography

Tuesday, June 2, 2020

काळे वास्तव ⚫

      
         काळा म्हणजे करपट भाजलेल्या भाकरी सारखा..आणि गोरा म्हणजे दुधासारखा पांढरा शुभ्र..काय फरक पडतो वर्णाचा?? पडत कसा नाही पडतो तर.. गोरी गोरी पान वहिनी आपल्यालाच हवी असते दादासाठी नाही का?? गोऱ्या रंगावरच लाल रंग शोभून दिसतो म्हणून हवी असते आपल्याला त्याच रंगाची नेलपॉलिश आणि त्याच रंगाची लिपस्टिक सुद्धा.. मुलगा पण निवडताना घरचे बघतात तो देखणा आणि गोरगोमटाच मुलगा.. पांढरे शुभ्र कपडे घातल्यावर चुकून डाग लागला तरी चालत नाही कुणाला तेव्हा इथे प्रश्न काळेपणाचा आला की गप्प बसून कसं चालेल.चेहऱ्यावर  गोरेपणा  कसा येईल हे टिव्ही वर दाखवली जाणारी जाहिरात सहजपणे आपल्याला भुरळ पाडते..हे आणि असे कितीतरी प्रसंग जे आता तुम्हाला आठवतही असतील.
       बरं अशाप्रसंगी समोरच्या व्यक्तीला न दुखवता नुसतंच उत्तर देतो ..काळं हे देवाचं... पण मनातून मात्र हा काळा देव अमान्य असतो त्याचं काय?? 
      आपल्या मनात समोरच्या व्यक्तीचं अस्तित्व हे जर रंगावरच टिकून ठेवायचं असेल, तर "त्याच्यातील छुप्या कलागुणांना दाद पोहचेल कशी?, की वर्णभेदाच्या नावाखाली ती ही झाकोळली जाईल??"
     आजही किती तरी मुलींना रंग गोरा नाही म्हणून लग्नासाठी मुलांकडून नाकारलं जातं ?? कितीतरी मुली ह्या लहानपणापासूनच आपल्या रंगाचा (अर्थात गोरा रंग नाही म्हणून) द्वेष करतात.. कितीतरी घरातून मुलीचा काळा रंग त्यामुळे लग्नासाठी स्थळ मिळणं अवघड म्हणून काहीही करून नकळत्या वयातच लग्न पार पाडलं जातं.. आज कितीतरी मुली ह्या घरातूनच वर्णभेदाच्या शिकारीमुळे मागे पडलेल्या दिसतात.. आज कितीतरी मुली ह्या लग्नानंतर देखील रंगावरून टोमणेच खाताना दिसतात..शाळेत तर कधी मैत्रिणी चिडवतानाही दिसतात ..असे आणिक खूप प्रसंग आपल्याला आजूबाजूलाच आढळतील..
    वास्तवातील गोष्ट अशी आहे की ,हे सगळे परिणाम त्या व्यक्तीला कदाचित हानीकारक ठरू शकतात, कदाचित सततचा वर्णभेदाचा वाढता ताण त्यांच्या आयुष्यात उदासीनतेकडे त्यांना सहज नेऊ शकतो.. आणि या गोष्टीचा विचार न करणारे आपण या गोष्टींसाठी जबाबदार होऊ शकतो.. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कमजोर करायचं की त्याच्या कमजोरीला आपल्या दृष्टीने थारा नाही दयायचा हे ठरवणं सर्वोतोपरी आपल्या हातात आहे..
    आणि उरला प्रश्न काळं हे देवाचं तर हा देव त्या माणसात शोधायला शिकलं की सोप्प्या प्रकारे उलगडलं जातं हे वर्णभेदाचं समीकरण .. !!

      - प्राची झाडे 🎀

#loveyourself  #racist

Tuesday, September 17, 2019

स्वीकार


    आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला भेटणारी ती किंवा तो हा आपल्या नजरेत ठरलेला असतोच. म्हणजे तो किंवा ती आपली आवडणारी व्यक्तीच असावी असं मी म्हणत नाहीये.आज विषय आयुष्यात आलेल्या आवडत्या नाही तर, न आवडलेल्या व्यक्ती ,आणि स्वतःला स्वीकारणं यांवर आहे. यात वावग लिहिण्यासारखं काय आहे हे बरेच जणांना वाटेल. पण का बरं आपण नाही स्वीकारू शकलो अशा व्यक्तींना, याचा कधीतरी विचार करणं हे आपल्या व्यक्तिमत्वाला खंगाळुन काढण्याइतपात बरोबरीचं आहे.
" शी कसली मंद आहे ग ती.."
"अरे..याला काही डोकं आहे की नाही?"
"अगग..तिचे कपडे तर बघ कसे झगमगा टाईप आहेत.."
"याला काय मुलगी पटणार.. नाकावरचा चष्मा सांभाळ म्हणा पहिला.."
"हिला कोण भाव देणार.."
"तिला साधं इंग्लिश नाही येत..."
"अशा मुलींचा क्लास च 3rd असतो..."
"अरे पार्टी साठी पैसे हवे ना त्याच्याकडे.."
"स्टँडर्ड कसे विसरतात हे लोक काय माहीत.."
"आली लगेच तोंड घेऊन.."
"तोंड बघ आरशात.."
"साधा परफ्यूम नाही मारता येत यांना"
"साधं ट्युशन लावायला पैसे नाही हिच्या आई बापाकडे"
"तुझ्या लायकीचं नाही हे रेस्तराँ"
"अरे मुलांना साधा पिझ्झा खाऊ नाही घालत ही बाई..शी होऊ चिपप..."
"ऍडमिट केलं तर बघ कोणत्या घाणेरड्या हॉस्पिटल मध्ये"
"पैसेच नसतील त्यांच्याकडे.."
"एक वेळच जेवण महाग पडतं तुला तू काय खरेदी करणार तिथे येऊन.."
"आमच्यासोबत नको येउस..तू एकटी जा"
"सेन्स च नाहीये त्याला.."
"ती वेडी आमची मैत्रीण नाहीये.. "
"माझे केस किती वाईट आहेत"
"त्याला मी आवडेल का अशी भोळसट"
"तो काळा माणूस हिचा नवरा आहे. कुठे भेटला कुणास ठाऊक.."
ब्ला ब्ला ब्ला ब्ला .....असे आणि यापेक्षा कितीतरी वाक्य आपल्याला शाळेत ,कॉलेज,ऑफिस,शेजारी,नातेवाईकांमध्ये आणि इतरत्र ऐकू तर नक्कीच येतात किंवा आपसूक बोलले जातात..आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यांवर या न आवडलेल्या किंवा स्वीकार न केलेल्या या व्यक्ती अपेक्षित असो किंवा अनपेक्षित रित्या आपल्याला भेटतातच.ठीक आहे यात कुणाच मन दुखावण्याचा आपला उद्देश नसला तरी ते आपण कळत नकळत दुखवतोच हे नक्की..एकतर माणसाचं मन अस असतं की त्याला स्वतःच मत मांडायचं असतं.. आणि ते त्याने मांडावे..अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक अविभाज्य घटक आहे तो.. पण याचा त्रास कदाचित त्या व्यक्तीला होत असेल हा विचार नक्कीच केला पाहिजे.. शेवटी कुणाच्या विषयी चांगलं बोलता येत नसेल तर वाईट बोलणं हे पापच..अगदी स्वतःविषयी वाईट बोलणं देखील..
        असो..पण आपण किती शुल्लक गोष्टींवरून या व्यक्तींचा स्वीकार करण्यास मागे पडतो..कुणाच्या दिसण्यावरुन,मालमत्तेवरून,त्याच्या आवडी निवडी वरून, पैशांवरून,स्वभावावरून, आणि अशा कितीतरी अनेक गोष्टींवरुन..खरं सांगायचं तर प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो.. प्रत्येकामध्ये एक छुपी खासियत असते..नसेल दिसायला अगदी सुंदर तुम्हाला हवा तसा पण एक असा गुण त्यात नक्कीच असणार जो कदाचित तुमच्यात नसेल..जो गुण तुम्हाला घ्यावासा पण वाटत असेल त्या व्यक्तीकडून पण घोडं आडतं कुठे तर स्टॅंडर्ड वर..मैत्री करण्यामध्ये पण काहींना आपला स्टॅंडर्ड जपायचा असतो,खरंय नाहीतर त्यांचा इगो दुखावला नाही का जाणार.. अहो,कसला इगो आणि कसलं काय घेऊन बसलात..माणूस जसा आहे तसा एकदा स्वीकारून तर बघा.. कदाचित आयुष्यात तुम्हांला त्याचं महत्व एखाद्या स्टॅंडर्ड पेक्षा जास्त वाटेल.. व्यक्तिमत्व हे छान छान कपडे घालून खुलवता येत नाही..पैसे पाहून माणुसकी विकत घेता येत नाही.इगो जपून आपण फक्त दुःख देऊ शकतो सुख विकत नाही घेऊ शकत..सुंदरता ही निरंतर टिकणारी नसते वयाप्रमाणे ती लुप्त होते..या सगळ्या गोष्टी निव्वळ दिखावा करण्याइतपत योग्य असतात.. कदाचित एक स्वीकार नावडत्याला आवडतं बनवणं हा आनंददायी आणि समाधानी नक्कीच आहे.यापेक्षा अनमोल भेट तुम्ही त्या व्यक्तीला काहीच देऊ शकत नाही..स्वतःचा आणि नावडत्या व्यक्तींचा स्वीकार करून स्वतःच्या व्यक्तिमत्वाला थोडंस खुलू द्या..
   आणि हो स्वीकार करायचा असेल तर अगदी मनापासून करा..😊😊
                 
                                                                                     By- Prachi ZadeFriday, September 6, 2019

हिमालयाच्या कुशीतले सिक्कीम

       
               आखाती देशात वास्तव्यास असल्यामुळे तिकडे नुसतं वाळवंटी जीवन.भर दिवसा पडणारं भयाण ऊन त्यात किंचित वाऱ्याची झुळूक मिळणं कठीणच.. त्यामुळे सुट्टीसाठी जेव्हा भारतात जाण्याची तयारी सुरू व्हायची ती आनंदातच.. खरं तर जगाच्या पाठीवर आपण कुठेही फिरा पण आपली मायभूमी हीच खरी सगळ्यात भारी आहे ही जाणीव प्रत्येक भारतीयांच्या तोंडून बाहेर पडतेच पडते. कारण आपला भारत देश आहेच जगात भारी..!!भारत हा विविधतेने नटलेला एक खूप सुंदर देश आहे. भारताला निसर्गाची एक अनमोल देणगी लाभलेली आहे हे सत्य आहे. 

         नुकतीच आम्ही सिक्कीम या सुंदर अशा छोट्या राज्यात फिरण्यास गेलो होतो. सिक्किम हे  भारतातील देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेल्या सिक्कीमच्या दक्षिणेला भारताचे पश्चिम हे राज्य, पूर्वेस भूतान , पश्चिमेस नेपाळ तर उत्तरेस चीन देशाचा तिबेट स्वायत्त प्रदेश आहेत.हिमालयाच्या कुशीत वसलेलं निसर्गाने नटलेलं हे राज्य त्याच्या प्रेमात सहज पाडेल. सिक्कीम ची राजधानी गॅंगटोक हे शहर डोंगराच्या कुशीत उभारलेलं आहे. इथले बहुतेक लोक हे बौद्ध धर्माचे आणि नेपाळी वंशाचे आढळून येतात. गॅंगटोक ला जाण्यासाठी सिल्लीगुडी वरून जावे लागते यात 6-8 तासांचा वेळ लागतो अगदी थकवा ही येऊन जातो. पण तिथे पोहचता क्षणीच आपला थकवा सौम्य आणि थंड वातावरणाने नाहीसा होऊन जातो. इथे गेल्यावर आपल्याला इथल्या लोकांमध्ये आपल्या भारताबद्दल असलेली माणुसकी ,आपुलकी,आणि जिव्हाळा त्यांच्या संस्कृतीमधून आढळून येतो. तिथून चीन ची सीमा रेखा अगदी जवळ असून देखील हे लोक आपले वास्तव्य खूप ताकदीने उभारताना आढळतात. डोंगराळ भाग असल्याने सतत दरड कोसळणे, पावसाने रस्ते वाहून जाणे, भूकंप वगैरे आपत्तींना सिक्कीम येथील रहिवाशांना सामोरे जावे लागते त्यामुळे इथे भारतीय सैन्याच्या तुकड्या देखील आहेत.आणि भारतीय सैन्याचा हा जोश हा सर्व भारतीयांना माहीतच आहे त्यांचं अशा ठिकाणी जिथे OXYGEN चे प्रमाण कमी असते तिथे राहून आपली रक्षा करणे म्हणजे खूप मोठं बलिदान आहे. असं काही दृश्य इथे पाहून प्रत्येक भारतीय गहिवरल्यापासून राहत नाही.

     सिक्कीम मध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. इथे बौद्ध धर्म असल्यामुळे इथल्या धार्मिक मॉनेस्ट्री पाहण्याजोग्या आणि वाखान्याजोग्या आहेत.इथे गेल्यावर शांतता ही मनाला ओढ लावते .इथे अनेक मुलं लामा चे प्रशिक्षण घेण्यासाठी मॉनेस्ट्री मध्ये वास्तव्य करतात. इथली रुमटेक ही फार जुनी आणि प्रसिद्ध मॉनेस्ट्री आहे.इथे आपल्याला निळा ,सफेद ,लाल,पिवळा आणि हिरवा असे एकापाठोपाठ एक तोरणात गुंफलेले फ्लॅग आकर्षित करतात.

       इथले लोक नेपाळी बोलीभाषा बोलतात.सिक्कीम मध्ये मोमो आणि नुडल्स हे चाईनिझ चे खाद्यपदार्थ खाण्यास मिळतात. तसेच इथल्या घरगुती पदार्थ अगदीच कमी तिखटाचे असतात.त्यात हळदीचा वापर जास्त असून जेवण अगदीच चविष्ट असते.हलक्या आहाराचा समावेश सिक्कीम मधील घरगुती जेवणात केलेला असतो.
        इथे येणारे लोक हे जास्त करून सिक्कीम च्या प्रेमात पडण्याचे एकमेव कारण म्हणजे इथले निसर्गसौंदर्य इथे वाहणारी नदी,धबधबे,उंचच उंच हिरवीगार झाडं, मधेच पडणारे धुके,रिमझिम पडणारा पाऊस,आणि गारवा या वातावरणात सिक्कीम चे सौंदर्य आणखीनच खुलून येते. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत.चहाचे शेती देखील या भागात आपल्याला पाहायला मिळते.वर उंच डोंगरावर चमकणारे बर्फाच्छादित डोंगरांची रास ...अहाहा, एका मेजवणीपेक्षा कमी नाही.

  हिमालयातील हा फेरफटका भारतीयांनी अवश्य अनुभवावा असा अनमोल खजिना आहे ते म्हणजे सिक्कीम.सिक्कीम हा आपल्या देशाला लाभलेला एक परंपरेचा आणि निसर्गाचा एक वारसा आहे. आणि तो आपण कायम टिकून ठेवला पाहिजे.हा पृथ्वीवरचा स्वर्ग पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट दिली पाहिजे असं हिमालयाच्या कुशीतलं हे बाळ म्हणजे सिक्कीम !!!!

               By :- Prachi Zade