Tuesday, June 2, 2020

काळे वास्तव ⚫

      
         काळा म्हणजे करपट भाजलेल्या भाकरी सारखा..आणि गोरा म्हणजे दुधासारखा पांढरा शुभ्र..काय फरक पडतो वर्णाचा?? पडत कसा नाही पडतो तर.. गोरी गोरी पान वहिनी आपल्यालाच हवी असते दादासाठी नाही का?? गोऱ्या रंगावरच लाल रंग शोभून दिसतो म्हणून हवी असते आपल्याला त्याच रंगाची नेलपॉलिश आणि त्याच रंगाची लिपस्टिक सुद्धा.. मुलगा पण निवडताना घरचे बघतात तो देखणा आणि गोरगोमटाच मुलगा.. पांढरे शुभ्र कपडे घातल्यावर चुकून डाग लागला तरी चालत नाही कुणाला तेव्हा इथे प्रश्न काळेपणाचा आला की गप्प बसून कसं चालेल.चेहऱ्यावर  गोरेपणा  कसा येईल हे टिव्ही वर दाखवली जाणारी जाहिरात सहजपणे आपल्याला भुरळ पाडते..हे आणि असे कितीतरी प्रसंग जे आता तुम्हाला आठवतही असतील.
       बरं अशाप्रसंगी समोरच्या व्यक्तीला न दुखवता नुसतंच उत्तर देतो ..काळं हे देवाचं... पण मनातून मात्र हा काळा देव अमान्य असतो त्याचं काय?? 
      आपल्या मनात समोरच्या व्यक्तीचं अस्तित्व हे जर रंगावरच टिकून ठेवायचं असेल, तर "त्याच्यातील छुप्या कलागुणांना दाद पोहचेल कशी?, की वर्णभेदाच्या नावाखाली ती ही झाकोळली जाईल??"
     आजही किती तरी मुलींना रंग गोरा नाही म्हणून लग्नासाठी मुलांकडून नाकारलं जातं ?? कितीतरी मुली ह्या लहानपणापासूनच आपल्या रंगाचा (अर्थात गोरा रंग नाही म्हणून) द्वेष करतात.. कितीतरी घरातून मुलीचा काळा रंग त्यामुळे लग्नासाठी स्थळ मिळणं अवघड म्हणून काहीही करून नकळत्या वयातच लग्न पार पाडलं जातं.. आज कितीतरी मुली ह्या घरातूनच वर्णभेदाच्या शिकारीमुळे मागे पडलेल्या दिसतात.. आज कितीतरी मुली ह्या लग्नानंतर देखील रंगावरून टोमणेच खाताना दिसतात..शाळेत तर कधी मैत्रिणी चिडवतानाही दिसतात ..असे आणिक खूप प्रसंग आपल्याला आजूबाजूलाच आढळतील..
    वास्तवातील गोष्ट अशी आहे की ,हे सगळे परिणाम त्या व्यक्तीला कदाचित हानीकारक ठरू शकतात, कदाचित सततचा वर्णभेदाचा वाढता ताण त्यांच्या आयुष्यात उदासीनतेकडे त्यांना सहज नेऊ शकतो.. आणि या गोष्टीचा विचार न करणारे आपण या गोष्टींसाठी जबाबदार होऊ शकतो.. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कमजोर करायचं की त्याच्या कमजोरीला आपल्या दृष्टीने थारा नाही दयायचा हे ठरवणं सर्वोतोपरी आपल्या हातात आहे..
    आणि उरला प्रश्न काळं हे देवाचं तर हा देव त्या माणसात शोधायला शिकलं की सोप्प्या प्रकारे उलगडलं जातं हे वर्णभेदाचं समीकरण .. !!

      - प्राची झाडे 🎀

#loveyourself  #racist

No comments:

Post a Comment