Friday, June 5, 2020

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी


                 

       प्रत्येक स्त्री ही आपल्या आयुष्यात खूप संकटाना पार करीत असते. प्रत्येकीचे आयुष्यत येणारे संकट वेगळवेगळी असतात.काही जिद्दीने लढतात,काही प्रतिकार करतात,काही सहन करतात,तर काही हार मानतात. समाजात स्त्री ला दुय्यम स्थान दिले आहे ..आणि याची उदाहरणं जेवढी देऊ तेवढी कमीच त्यातली ही स्त्री, जे नशिबी भोग आले आहे ते स्वीकारून आपले आयुष्य जगणारी..ही कविता त्या स्त्रियांना समर्पित ज्या आयुष्य हे फक्त तडजोडीवर  निभवत आहेत.



ही "ती" ची कहाणी,
का आले असावे तिच्या नयनी पाणी ??
मृगजळाच्या गोष्टींवर विश्वास ठेवणारी ती,
धास्तावलेली खूप काही मिळवण्यासाठी,
भूतकाळाच्या पाऊलखुणा दूर सारून,
वर्तमानाच्या जबाबदारीचा कडेवर लादून,
भविष्याच्या उमेदीच्या सांगड घालून,
राखीव आयुष्याकडे एक पाऊल टाकून,
मायेच्या उंबरठ्यापलीकडे हद्दपार झालेली,
ही "ती"  ची कहाणी खरंच का आले असावे तिच्या नयनी पाणी??
एक जाणीव मनात घेऊन,
एकदा मोडलेला पत्त्यांचा डाव,
पुन्हा रचण्यास ती सज्ज,
नवा जोश,नवी उमेद,नवे स्वप्न,
यात गुंफलेलं एक नवीन नातं,
होती मृगजळाची ही शर्यत जिंकायची,
मात्र हे सारं करताना ती स्वतःला विसरायची,
ही "ती" ची कहाणी,खरंच का आले असावे तिच्या नयनी पाणी?
तिची कहाणी इथेच थांबली नाही,
अशातच तिच्या सुखाच्या बहरत होत्या रात्री कितीक,
मात्र दुःखाच्या बिथरत होत्या अगणितिक,
विश्वासाचे बांध कोमेजून,
शरीरावर खुना उमटवून तो निर्धास्तपनाने मिरवून समाजात या वावरत होता,
मात्र प्रेमाने तिला कधीही सावरत नव्हता,
ही "ती"ची कहाणी,खरंच का आले असावे तिच्या नयनी पाणी?
मृगजळाची कहाणी संपली होती
मागे तडजोड उरली होती,
ऐकून तिची ही कहाणी,
तिच्या सोबत माझ्याही नयनी पाणी..
स्वतःला दोष देत ती म्हणाली,
दुभंगी आयुष्य नशिबी आले, दोष कुणाला का मी द्यावे?
सांगतात का उगाच थोरले मोठे,
ठेविले अनंते तैसेचि रहावे..!!
By:- Prachi Zade 

साद निसर्गाची!!🕊️🍂


        आठवतं शाळेमध्ये बालभारतीच्या पुस्तकांमधील गोष्टी..किती  छान वाटायचं जेव्हा ती गोष्ट वाचताना किंवा ऐकताना स्वप्न रंगावायचो आपण..नाचणारे मोर,कापसासारखा असणारा ससा, मडके भरणाऱ्या सरी, पाऊसातल्या कागदी होड्या,याशिवाय डोंगराच्या पायथ्याला घर घराभोवती हिरवाई,विविध पक्षी,फळे,फुले आणि बाजूनेच संथ वाहणारी नदी, निळे शुभ्र असणारे स्वच्छंदी आकाश..आपली शाळा सुटते तशी पाखरांची शाळा ही सुटते असंच आपण आजही समजतो..चित्र रेखाटन करताना देखील निसर्गाचं हेच चित्र रंगवायचो..आणि मामाच्या गावी जाणाऱ्या झुक झुक गाडीचा प्रवास, प्राण्यांविषयीचं आणि निसर्गाविषयीचं प्रेम, संगोपन या आणि कितीतरी  निसर्गाच्या गोष्टी ऐकून आपण कल्पनेचे बांध उराशी बांधून मोठे होत जातो..गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र असं समजणारे आपण आता गांडूळाची जागा रासायनिक खतांनी सर्रास घेतलेली आपण बघतो..आणि मग हळू हळू मोठं होताना जाणवतं की अरे आपण विचार केला तसा निसर्ग तर कुठे दिसतच नाही..हाती येते ती निराशा..कदाचित मग हे निराशेचे ओझे पेलवतच आपण निसर्गाच्या हानीचे याची देही याची डोळा साक्षीदार होतो..
     भरभरून देतो ,सावरतो, सुखावतो,सांभाळतो,निरपेक्ष प्रेम करतो,सावली देतो,सुख दुःखाचा सोबती होतो , अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करतो,शुद्धता,ताजेपणा,३ ऋतूंचा वाटेकरी हे सगळं आपल्याला निस्वार्थाने देतो तो म्हणजे निसर्ग..
      आणि आपण काय देतो?? वृक्षतोड,कचरा, अशुद्ध हवा, मुक्या प्राण्यांची हिंसात्मक हत्या आणि कितीतरी शिकारी, काँक्रिटचे जंगलं, निसर्गाचं बाजारीकरण, रासायनिक खतांचा बेसुमार वापर..
    निसर्ग काय सांगू इच्छितो ते ऐकूया..कारण त्याचं जतन आणि संवर्धन हे आपल्याच हातात आहे. 
         - प्राची 🎀
#जागतिकपर्यावरणदिन 🕊️
#canonphotography

Tuesday, June 2, 2020

काळे वास्तव ⚫

      
         काळा म्हणजे करपट भाजलेल्या भाकरी सारखा..आणि गोरा म्हणजे दुधासारखा पांढरा शुभ्र..काय फरक पडतो वर्णाचा?? पडत कसा नाही पडतो तर.. गोरी गोरी पान वहिनी आपल्यालाच हवी असते दादासाठी नाही का?? गोऱ्या रंगावरच लाल रंग शोभून दिसतो म्हणून हवी असते आपल्याला त्याच रंगाची नेलपॉलिश आणि त्याच रंगाची लिपस्टिक सुद्धा.. मुलगा पण निवडताना घरचे बघतात तो देखणा आणि गोरगोमटाच मुलगा.. पांढरे शुभ्र कपडे घातल्यावर चुकून डाग लागला तरी चालत नाही कुणाला तेव्हा इथे प्रश्न काळेपणाचा आला की गप्प बसून कसं चालेल.चेहऱ्यावर  गोरेपणा  कसा येईल हे टिव्ही वर दाखवली जाणारी जाहिरात सहजपणे आपल्याला भुरळ पाडते..हे आणि असे कितीतरी प्रसंग जे आता तुम्हाला आठवतही असतील.
       बरं अशाप्रसंगी समोरच्या व्यक्तीला न दुखवता नुसतंच उत्तर देतो ..काळं हे देवाचं... पण मनातून मात्र हा काळा देव अमान्य असतो त्याचं काय?? 
      आपल्या मनात समोरच्या व्यक्तीचं अस्तित्व हे जर रंगावरच टिकून ठेवायचं असेल, तर "त्याच्यातील छुप्या कलागुणांना दाद पोहचेल कशी?, की वर्णभेदाच्या नावाखाली ती ही झाकोळली जाईल??"
     आजही किती तरी मुलींना रंग गोरा नाही म्हणून लग्नासाठी मुलांकडून नाकारलं जातं ?? कितीतरी मुली ह्या लहानपणापासूनच आपल्या रंगाचा (अर्थात गोरा रंग नाही म्हणून) द्वेष करतात.. कितीतरी घरातून मुलीचा काळा रंग त्यामुळे लग्नासाठी स्थळ मिळणं अवघड म्हणून काहीही करून नकळत्या वयातच लग्न पार पाडलं जातं.. आज कितीतरी मुली ह्या घरातूनच वर्णभेदाच्या शिकारीमुळे मागे पडलेल्या दिसतात.. आज कितीतरी मुली ह्या लग्नानंतर देखील रंगावरून टोमणेच खाताना दिसतात..शाळेत तर कधी मैत्रिणी चिडवतानाही दिसतात ..असे आणिक खूप प्रसंग आपल्याला आजूबाजूलाच आढळतील..
    वास्तवातील गोष्ट अशी आहे की ,हे सगळे परिणाम त्या व्यक्तीला कदाचित हानीकारक ठरू शकतात, कदाचित सततचा वर्णभेदाचा वाढता ताण त्यांच्या आयुष्यात उदासीनतेकडे त्यांना सहज नेऊ शकतो.. आणि या गोष्टीचा विचार न करणारे आपण या गोष्टींसाठी जबाबदार होऊ शकतो.. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कमजोर करायचं की त्याच्या कमजोरीला आपल्या दृष्टीने थारा नाही दयायचा हे ठरवणं सर्वोतोपरी आपल्या हातात आहे..
    आणि उरला प्रश्न काळं हे देवाचं तर हा देव त्या माणसात शोधायला शिकलं की सोप्प्या प्रकारे उलगडलं जातं हे वर्णभेदाचं समीकरण .. !!

      - प्राची झाडे 🎀

#loveyourself  #racist