Tuesday, September 17, 2019

स्वीकार


    आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला भेटणारी ती किंवा तो हा आपल्या नजरेत ठरलेला असतोच. म्हणजे तो किंवा ती आपली आवडणारी व्यक्तीच असावी असं मी म्हणत नाहीये.आज विषय आयुष्यात आलेल्या आवडत्या नाही तर, न आवडलेल्या व्यक्ती ,आणि स्वतःला स्वीकारणं यांवर आहे. यात वावग लिहिण्यासारखं काय आहे हे बरेच जणांना वाटेल. पण का बरं आपण नाही स्वीकारू शकलो अशा व्यक्तींना, याचा कधीतरी विचार करणं हे आपल्या व्यक्तिमत्वाला खंगाळुन काढण्याइतपात बरोबरीचं आहे.
" शी कसली मंद आहे ग ती.."
"अरे..याला काही डोकं आहे की नाही?"
"अगग..तिचे कपडे तर बघ कसे झगमगा टाईप आहेत.."
"याला काय मुलगी पटणार.. नाकावरचा चष्मा सांभाळ म्हणा पहिला.."
"हिला कोण भाव देणार.."
"तिला साधं इंग्लिश नाही येत..."
"अशा मुलींचा क्लास च 3rd असतो..."
"अरे पार्टी साठी पैसे हवे ना त्याच्याकडे.."
"स्टँडर्ड कसे विसरतात हे लोक काय माहीत.."
"आली लगेच तोंड घेऊन.."
"तोंड बघ आरशात.."
"साधा परफ्यूम नाही मारता येत यांना"
"साधं ट्युशन लावायला पैसे नाही हिच्या आई बापाकडे"
"तुझ्या लायकीचं नाही हे रेस्तराँ"
"अरे मुलांना साधा पिझ्झा खाऊ नाही घालत ही बाई..शी होऊ चिपप..."
"ऍडमिट केलं तर बघ कोणत्या घाणेरड्या हॉस्पिटल मध्ये"
"पैसेच नसतील त्यांच्याकडे.."
"एक वेळच जेवण महाग पडतं तुला तू काय खरेदी करणार तिथे येऊन.."
"आमच्यासोबत नको येउस..तू एकटी जा"
"सेन्स च नाहीये त्याला.."
"ती वेडी आमची मैत्रीण नाहीये.. "
"माझे केस किती वाईट आहेत"
"त्याला मी आवडेल का अशी भोळसट"
"तो काळा माणूस हिचा नवरा आहे. कुठे भेटला कुणास ठाऊक.."
ब्ला ब्ला ब्ला ब्ला .....असे आणि यापेक्षा कितीतरी वाक्य आपल्याला शाळेत ,कॉलेज,ऑफिस,शेजारी,नातेवाईकांमध्ये आणि इतरत्र ऐकू तर नक्कीच येतात किंवा आपसूक बोलले जातात..आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यांवर या न आवडलेल्या किंवा स्वीकार न केलेल्या या व्यक्ती अपेक्षित असो किंवा अनपेक्षित रित्या आपल्याला भेटतातच.ठीक आहे यात कुणाच मन दुखावण्याचा आपला उद्देश नसला तरी ते आपण कळत नकळत दुखवतोच हे नक्की..एकतर माणसाचं मन अस असतं की त्याला स्वतःच मत मांडायचं असतं.. आणि ते त्याने मांडावे..अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक अविभाज्य घटक आहे तो.. पण याचा त्रास कदाचित त्या व्यक्तीला होत असेल हा विचार नक्कीच केला पाहिजे.. शेवटी कुणाच्या विषयी चांगलं बोलता येत नसेल तर वाईट बोलणं हे पापच..अगदी स्वतःविषयी वाईट बोलणं देखील..
        असो..पण आपण किती शुल्लक गोष्टींवरून या व्यक्तींचा स्वीकार करण्यास मागे पडतो..कुणाच्या दिसण्यावरुन,मालमत्तेवरून,त्याच्या आवडी निवडी वरून, पैशांवरून,स्वभावावरून, आणि अशा कितीतरी अनेक गोष्टींवरुन..खरं सांगायचं तर प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो.. प्रत्येकामध्ये एक छुपी खासियत असते..नसेल दिसायला अगदी सुंदर तुम्हाला हवा तसा पण एक असा गुण त्यात नक्कीच असणार जो कदाचित तुमच्यात नसेल..जो गुण तुम्हाला घ्यावासा पण वाटत असेल त्या व्यक्तीकडून पण घोडं आडतं कुठे तर स्टॅंडर्ड वर..मैत्री करण्यामध्ये पण काहींना आपला स्टॅंडर्ड जपायचा असतो,खरंय नाहीतर त्यांचा इगो दुखावला नाही का जाणार.. अहो,कसला इगो आणि कसलं काय घेऊन बसलात..माणूस जसा आहे तसा एकदा स्वीकारून तर बघा.. कदाचित आयुष्यात तुम्हांला त्याचं महत्व एखाद्या स्टॅंडर्ड पेक्षा जास्त वाटेल.. व्यक्तिमत्व हे छान छान कपडे घालून खुलवता येत नाही..पैसे पाहून माणुसकी विकत घेता येत नाही.इगो जपून आपण फक्त दुःख देऊ शकतो सुख विकत नाही घेऊ शकत..सुंदरता ही निरंतर टिकणारी नसते वयाप्रमाणे ती लुप्त होते..या सगळ्या गोष्टी निव्वळ दिखावा करण्याइतपत योग्य असतात.. कदाचित एक स्वीकार नावडत्याला आवडतं बनवणं हा आनंददायी आणि समाधानी नक्कीच आहे.यापेक्षा अनमोल भेट तुम्ही त्या व्यक्तीला काहीच देऊ शकत नाही..स्वतःचा आणि नावडत्या व्यक्तींचा स्वीकार करून स्वतःच्या व्यक्तिमत्वाला थोडंस खुलू द्या..
   आणि हो स्वीकार करायचा असेल तर अगदी मनापासून करा..😊😊
                 
                                                                                     By- Prachi Zade



2 comments: