आखाती देशात वास्तव्यास असल्यामुळे तिकडे नुसतं वाळवंटी जीवन.भर दिवसा पडणारं भयाण ऊन त्यात किंचित वाऱ्याची झुळूक मिळणं कठीणच.. त्यामुळे सुट्टीसाठी जेव्हा भारतात जाण्याची तयारी सुरू व्हायची ती आनंदातच.. खरं तर जगाच्या पाठीवर आपण कुठेही फिरा पण आपली मायभूमी हीच खरी सगळ्यात भारी आहे ही जाणीव प्रत्येक भारतीयांच्या तोंडून बाहेर पडतेच पडते. कारण आपला भारत देश आहेच जगात भारी..!!भारत हा विविधतेने नटलेला एक खूप सुंदर देश आहे. भारताला निसर्गाची एक अनमोल देणगी लाभलेली आहे हे सत्य आहे.
नुकतीच आम्ही सिक्कीम या सुंदर अशा छोट्या राज्यात फिरण्यास गेलो होतो. सिक्किम हे भारतातील देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. हिमालय पर्वतरांगेमध्ये वसलेल्या सिक्कीमच्या दक्षिणेला भारताचे पश्चिम हे राज्य, पूर्वेस भूतान , पश्चिमेस नेपाळ तर उत्तरेस चीन देशाचा तिबेट स्वायत्त प्रदेश आहेत.हिमालयाच्या कुशीत वसलेलं निसर्गाने नटलेलं हे राज्य त्याच्या प्रेमात सहज पाडेल. सिक्कीम ची राजधानी गॅंगटोक हे शहर डोंगराच्या कुशीत उभारलेलं आहे. इथले बहुतेक लोक हे बौद्ध धर्माचे आणि नेपाळी वंशाचे आढळून येतात. गॅंगटोक ला जाण्यासाठी सिल्लीगुडी वरून जावे लागते यात 6-8 तासांचा वेळ लागतो अगदी थकवा ही येऊन जातो. पण तिथे पोहचता क्षणीच आपला थकवा सौम्य आणि थंड वातावरणाने नाहीसा होऊन जातो. इथे गेल्यावर आपल्याला इथल्या लोकांमध्ये आपल्या भारताबद्दल असलेली माणुसकी ,आपुलकी,आणि जिव्हाळा त्यांच्या संस्कृतीमधून आढळून येतो. तिथून चीन ची सीमा रेखा अगदी जवळ असून देखील हे लोक आपले वास्तव्य खूप ताकदीने उभारताना आढळतात. डोंगराळ भाग असल्याने सतत दरड कोसळणे, पावसाने रस्ते वाहून जाणे, भूकंप वगैरे आपत्तींना सिक्कीम येथील रहिवाशांना सामोरे जावे लागते त्यामुळे इथे भारतीय सैन्याच्या तुकड्या देखील आहेत.आणि भारतीय सैन्याचा हा जोश हा सर्व भारतीयांना माहीतच आहे त्यांचं अशा ठिकाणी जिथे OXYGEN चे प्रमाण कमी असते तिथे राहून आपली रक्षा करणे म्हणजे खूप मोठं बलिदान आहे. असं काही दृश्य इथे पाहून प्रत्येक भारतीय गहिवरल्यापासून राहत नाही.
सिक्कीम मध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. इथे बौद्ध धर्म असल्यामुळे इथल्या धार्मिक मॉनेस्ट्री पाहण्याजोग्या आणि वाखान्याजोग्या आहेत.इथे गेल्यावर शांतता ही मनाला ओढ लावते .इथे अनेक मुलं लामा चे प्रशिक्षण घेण्यासाठी मॉनेस्ट्री मध्ये वास्तव्य करतात. इथली रुमटेक ही फार जुनी आणि प्रसिद्ध मॉनेस्ट्री आहे.इथे आपल्याला निळा ,सफेद ,लाल,पिवळा आणि हिरवा असे एकापाठोपाठ एक तोरणात गुंफलेले फ्लॅग आकर्षित करतात.
इथले लोक नेपाळी बोलीभाषा बोलतात.सिक्कीम मध्ये मोमो आणि नुडल्स हे चाईनिझ चे खाद्यपदार्थ खाण्यास मिळतात. तसेच इथल्या घरगुती पदार्थ अगदीच कमी तिखटाचे असतात.त्यात हळदीचा वापर जास्त असून जेवण अगदीच चविष्ट असते.हलक्या आहाराचा समावेश सिक्कीम मधील घरगुती जेवणात केलेला असतो.
इथे येणारे लोक हे जास्त करून सिक्कीम च्या प्रेमात पडण्याचे एकमेव कारण म्हणजे इथले निसर्गसौंदर्य इथे वाहणारी नदी,धबधबे,उंचच उंच हिरवीगार झाडं, मधेच पडणारे धुके,रिमझिम पडणारा पाऊस,आणि गारवा या वातावरणात सिक्कीम चे सौंदर्य आणखीनच खुलून येते. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत.चहाचे शेती देखील या भागात आपल्याला पाहायला मिळते.वर उंच डोंगरावर चमकणारे बर्फाच्छादित डोंगरांची रास ...अहाहा, एका मेजवणीपेक्षा कमी नाही.
हिमालयातील हा फेरफटका भारतीयांनी अवश्य अनुभवावा असा अनमोल खजिना आहे ते म्हणजे सिक्कीम.सिक्कीम हा आपल्या देशाला लाभलेला एक परंपरेचा आणि निसर्गाचा एक वारसा आहे. आणि तो आपण कायम टिकून ठेवला पाहिजे.हा पृथ्वीवरचा स्वर्ग पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट दिली पाहिजे असं हिमालयाच्या कुशीतलं हे बाळ म्हणजे सिक्कीम !!!!
By :- Prachi Zade
Yeah
ReplyDelete