" आभासी जगाच्या पलीकडचे सत्य "
आपण सगळे जण आयुष्यात पुढे चाललो आहोत… कुणी वेगाने, कुणी हळूहळू, कुणी थांबत-थांबत. पण या प्रवासात एक भावना मात्र जवळजवळ सगळ्यांना भिडते—“अरे, तो तर किती पुढे गेला… आणि मी अजून इथेच.
आजच्या आभासी जगात हे आणखीन सहज वाटतं. इंस्टाग्रामवर एखादा छान फोटो, एखादं यश, एखादी विदेश-ट्रिप—हे पाहिलं की आपल्या मनात एक छोटासा आवाज उठतो, “आपण काय करत आहोत? आपल्याला का नीट जमत नाही?” पण खरं सांगायचं तर— कुणाचंही आयुष्य फोटो किंवा पोस्टमधून पूर्ण दिसत नाही.प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं, आणि महत्वाचं म्हणजे— कोणीच 24 तास सोशल मीडियावर त्यांचा संघर्ष दाखवत नाही.
आपण काय पाहतो? त्यांची हायलाइट रील.....आणि त्याच्याशी तुलना करतो आपली रिअल लाईफ.
त्यांनी किती पडझडी पाहिल्या, किती रात्री रडून काढल्या, किती अपयश झेललं—हे आपल्याला दिसतच नाही.आपल्याला दिसतो फक्त त्यांचा सुंदर क्षण…पण त्या क्षणामागची राख, अंधार, मेहनत—आपल्याला कळत नाही.
आणि मग अशा तुलनेने आपणच खचतो. आपल्याच क्षमतेवर शंका येऊ लागते. आपल्याला वाटायला लागतं की आपला प्रवासच चुकीचा आहे. पण हेच खरे संकट आहे—तुलना. कारण तुलना कधीच आनंद देत नाही; ती आपल्याला आतून थकवते, रिकामं करते. म्हणूनच स्वतःला दरवेळी आत्मसात हवं—आपण आपल्या प्रवासात आहोत. आपल्या गतीने, आपल्या पद्धतीने, आपल्या मार्गाने. एखादा पुढे गेला म्हणून आपण मागे नाही— फक्त आपली वेळ अजून आलेली नसते. कधी कधी हळू चालणारे लोकच जास्त स्थिर, जास्त मजबूत आणि आतून जास्त तयार होत जातात. आणि खरी तयारी झाली की यशही जास्त सुंदर, जास्त टिकाऊ वाटतं.
आभासी जगात सगळं परफेक्ट दिसतं, पण सत्य नेहमीच सोपं नसतं. सत्य आणि शाश्वत आहे—ती आपली मेहनत, धडपड, स्वप्नं आणि संघर्ष. म्हणून स्वतःला कमी समजू नका. इतरांना पाहून खचू नका. प्रेरणा घ्या, पण तुलना करू नका. तुमचा वेग जरी वेगळा असला तरी तुम्ही तुमच्या मार्गावर आहात—आणि तो मार्ग तुमच्यासाठीच खास आहे.
आयुष्य ही स्पर्धा नाही.तो एक सुंदर, वैयक्तिक प्रवास आहे—आणि त्या प्रवासाचा नायक तुम्हीच आहात. तुमचं आयुष्य आधीच सुंदर आहे—फक्त ते दुसऱ्यांच्या प्रकाशात मोजू नका.एक दिवस तुमचं प्रकाशमानही इतकं तेजस्वी होईल की जग तुमच्या वेगळेपणाने उजळून निघेल.
~प्राची🌼
No comments:
Post a Comment